भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून Arzan Nagwaswalla रचला इतिहास; इंग्लंडविरुद्धच्या खेळण्यात येणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी देखील कसोटी संघाची निवड

यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (ICC World Test Championship Final) बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली.

यासह इंग्लंडविरुद्धच्या खेळण्यात येणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी देखील कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गुजरातचा (Gujarat) वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla) या युवा गोलंदाजाला संधी देण्यात आला आहे.

अर्जन नागवासवाला 23 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयातच त्याने इतिहास घडविला आहे. 46 वर्षानंतर तो भारतीय पुरुष संघात निवडला जाणारा पहिला पारशी क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी फारुख इंजीनियर हे भारतीय संघाचा भाग होते. 

अर्जन नागवासवाला गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील नारगोल खेड्यातील आहे. त्याने आपल्या राज्यात 16 प्रथम श्रेणी, 20 यादी अ आणि 15 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे 62, 39 आणि 21 बळी घेतले आहेत.

ऑल इंडिया सिनियर सिलेक्शन कमिटीने (All-India Senior Selection Committee) यासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे.

यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) कडे कर्णधार पदाची धुरा असून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे उपकर्णधारपद असणार आहे. याशिवाय टीम मध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, एच. विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, आर. जडेजा, एक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव हे खेळाडू असणार आहेत. दरम्यान, के. एल राहुल आणि वृद्धीमान शाह यांना फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर संघामध्ये जागा मिळू शकते.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक 72.2 गुण पटकावत भारताने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तर 70.0 गुणांसह न्युझीलँड दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्युझीलँडमध्ये या चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साउथहँप्टन (Southampton) मधील मैदानावर खेळवला जाणार आहे.