

देशात कोरोनाची चिंता वाढली असताना रुग्णांना झटपट बरे करणारे ‘2-डीजी’ हे रामबाण औषध लवकरच उपलब्ध होणार आहे.
डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओने (DRDO) तयार केलेल्या या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) शनिवारी आपत्कालीन मंजुरी दिली. हे औषध पावडररूपात असेल व ते पाण्यात मिसळून घ्यावे लागेल. या औषधामुळे रुग्णाच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मोठी मदत होते.
डीआरडीओची प्रयोगशाळा इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनने हैदराबादेतील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या मदतीने ‘2-डीजी’ औषध विकसित केले आहे.
औषधाच्या सुरुवातीच्या चाचण्यांतून कोरोना रुग्णांना मोठा दिलासा देणारे निष्कर्ष समोर आले आहेत. रुग्णांसाठी हे एक ऐच्छिक औषध असेल. संशोधन सुरू असताना ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले, त्यांचा आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला. तसेच कोरोना संसर्गाची पातळी रोखून रुग्णाला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यास औषध उपयुक्त ठरले. त्याचबरोबर रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीत सुधारणा होत असल्याचेही संशोधनात आढळले.
कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान हे औषध दिले जाऊ शकते. औषधाचे सहजरित्या मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले जाऊ शकते, असे डीआरडीओने म्हटले आहे.
देशात सध्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर, फेबिफ्लू यांसारख्या औषधांबरोबरच डॉक्टरांचा सल्ला आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करून नेजल स्प्रेचा वापर केला जात आहे. त्यात आता डीआरडीओच्या ‘2-डीजी’ औषधाला मंजुरी मिळाल्यामुळे देशातील कोरोनाचा मृत्युदर घटण्याची आशा आहे.

2-डीजी’ औषधाची तीन टप्प्यांत चाचणी झाली. डिसेंबर ते मार्चदरम्यान 220 रुग्णांवर अंतिम म्हणजेच तिसऱया टप्प्यातील चाचणी केली गेली. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामीळनाडू या दहा राज्यांतील 27 रुग्णालयांत ही चाचणी झाली. त्यात हे औषध कोरोनावर अत्यंत प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले.






