
मुंबई: महाराष्ट्र सरकारने आज कोरोना रोखण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.
आज सकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध लागू केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या पथकात GRP (रेल्वे पोलीस) – 1, राज्य पोलीस – 1 महसूल विभागाचा प्रतिनिधी – 1 आणि एक वैद्यकीय कर्मचारी असणार आहे. दरम्यान, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, अशांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. तर, लांब पल्ल्याच्या गाड्या चालूच राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना एक्सप्रेसने जायचं आहे, त्यांनाही रेल्वे स्थानकावर तिकीट दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.






