
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले असून सध्या याठिकाणी 50 ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. सोमवारी आमदार वैभव नाईक यांनी डीसीएचसी सेंटरला भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे लोकार्पण करण्यात आले. तर या रुग्णालयात लवकरच आणखी 150 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
या रूग्णालयात महिन्याभरापूर्वी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता डीसीएचसी सेंटर सुरू करण्यात आले असून याठिकाणी कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
या रूग्णालयाला खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक असणारे 52 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व 50 जंबो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहेत. 6 टनाचा लिक्विड ऑक्सिजन प्लांटदेखील लवकरच याठिकाणी उभारण्यात येणार आहे.
याठिकाणी 37 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 22 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. याठिकाणी आणखी 150 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नाईक यांनी रूग्णांना मिळत असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. तसेच आवश्यक त्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या.
यावेळी कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, अतुल बंगे, बाळा वेंगुर्लेकर, राजू गवंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. विद्याधर हनुमंते, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर आदी उपस्थित होते.






