अजून अनलॉक केलेले नाही, राज्य सरकारचे स्पष्टीकरण


वृत्तसंस्था 
मुंबई / राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांत अन लॉकची घोषणा केली. त्यामध्ये राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची वर्गवारी देखील सांगितली. या घोषणेनुसार उद्या पासून म्हणजेच शुक्रवार ४ जून पासून अंमल बजावणी सुरू होईल, असे देखील जाहीर केले. मात्र, त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असे  राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या सर्व निर्णयाने महा विकास आघाडी मधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. 


‘ब्रेक द  चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णया द्वारे अधि सूचित करण्यात येतील’, असे  देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पे निहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमल बजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते  शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल’, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.