
सोलापूर येथील शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांच्या कार्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही घेतली जात आहे.
नुकताच त्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) देऊन गौरविण्यात आले. ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले.
त्यानंतर आता त्यांना आणखी एक मानाचे स्थान मिळाले आहे. डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या (World Bank) शिक्षण विषयक सल्लागार (Education Advisor Of World Bank) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नियुक्ती असणार आहे. जगभरात शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी जागतिक बँकेने ग्लोबल कोच (Global Coach) नावाचा एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने डिसले गुरुजी यांची निवड झाली आहे.
जागतिक बँकेच्या उपक्रमानुसार जगभरातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा. मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ व्हावी. तसेच, जगभरामधील शिक्षकांच्या नेतृत्वगुणात कार्यक्षमता येण्याबरोबरच एकसूत्रताही यावी. शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसीत व्हावेत असा जागतिक बँकेच्या उपक्रमाचा उद्देश आहे.
जागतिक बँकेने या उपक्रमांतर्गत ठेवलेली उद्दीष्टे पूर्ण व्हावीत यासाठी जगभरातून 12 जणांची निवड करण्यात आली आहे. यात डिसले गुरुजींचा समावेश होतो.











