कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सर्वाधिक वाढण्याचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यंत्रणांना सुचना

राज्यातील विविध ठिकाणी लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांचा आकडा सर्वाधिक वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व यंत्रणांना सुचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आधीपासूनच त्या बद्दलची तयारी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. तर शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा आहे की नाही ते पहावे अशी सुचना दिली आहे. त्याचसोबत टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक पार पडली आहे. टास्क फोर्सच्या डॉक्टरांना सिरो सर्वे करण्यासह मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडण्यावर भर देण्यास सांगितले आहे. पण जर गर्दी वाढण्यासह नियमांचे उल्लंघन झाल्यास अवघ्या दोन महिन्यात आपल्याकडे तिसरी लाट येईल अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

तर कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी काही सुविधांची कमतरता भासली. पण दुसऱ्या लाटेवेळी त्यामध्ये अधिक वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु अवघ्या कमी वेळातच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दुप्पट पटीने वाढत असल्याचे दिसून आले. पण यामध्ये लढाई कायम राहिली आणि यामधून आपण खुप काही शिकलो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता  आहे. याधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार आहे. त्यामुळे अगोदर पासूनच त्यांची काळजी घेण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत लहान मुलांसाठी एक टास्क फोर्स सुद्धा प्रथमच तयार करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.