
मुंबई: राज ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर झाले होते. मात्र ईडी कार्यालयात ते एकटेच गेले होते. तब्बल पावणे नऊ तास राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली.
कोहिनूर मिलच्या व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती राज यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडे आठ वाजता राज ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी सर्वांना पाहून हात केला आणि स्मित हास्य केलं. त्यानंतर मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते थेट कुटुंबीयांच्या दिशेने गेले आणि दुसऱ्या गाडीतून रवाना झाले.
या आधी कोहिनूर मिलप्रकरणी उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना चौकशीसाठी दोनदा बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे राज यांनाही दुसऱ्या दिवशीही चौकशीसाठी हजर रहावे लागेल असं चित्रं होतं. परंतु राज यांना परत उद्या चौकशीसाठी बोलाविण्यात येणार नसल्याचे कळते. मात्र याप्रकरणाशी संबंधित इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.






