आपण वर्ल्ड कप मध्ये का हरलो?

खरं तर याविषयावर काही लिहिण्याची काही गरज आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु क्रिकेट म्हणजे आपल्याकडे नुसताच खेळ नसून तो एक धर्म आहे आणि म्हणूनच मी याविषयी लिहिण्याची तयारी केली. बुधवारी आपण न्यूझीलँड कडून फक्त अठरा धावांनी हरलो आणि टीम इंडिया चं पोस्ट मॉरटन सुरु झाले.

आपण साखळीत सगळे सामने जिंकत होतो म्हणून उणीवावर कोण बोट ठेवत नव्हते. आपल्या चूका या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध झाल्या असं नव्हे तर त्या फार पूर्वी जेव्हा संघ जाहीर करण्यात आला तेव्हाच झाल्या. भारतीय संघाने जवळपास दीड दोन वर्षे अंबाती रायडू ला मधल्या फळीत खेळवले, त्याने काही सामने जिंकून देऊन आपली क्षमता ही सिद्ध केली होती, असे असताना आपण त्याच्यावर अन्याय करून संघात तीन चार यष्टीरक्षक फलंदाज घेऊन गेलो. रिषभ पंतला संधी दिली ती विजय शंकर अन फीट झाल्यावर. शिखर धवन दुखापत ग्रस्त झाल्यावर मयांक अग्रवाल ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही एकदिवसीय सामना खेळण्याचा अनुभव नाही. अजिंक्य रहाणे आणि मनिष पांडे सारखे खेळाडू क्षमता असूनही घरीच बसले.

उपांत्य फेरीत न्यूझीलँड विरुद्ध सामन्यात आपले पाहिले तीन गडी दहा धावांच्या आत परतले असताना तेथे अनुभवी धोनी येणं अपेक्षित होते परंतु टीम व्यस्थापणेने नवख्या अन अनुभवी रिषभ पंत ला पाठविणाचा निर्णय घेतला. तसेच बुमराह नंतर सर्वात यशस्वी आणि वर्ल्ड कपमधील हट्रिक घेणारा गोलंदाज मोहम्मद शम्मी ला महत्वाच्या सामन्यात संघाबाहेर बसविता ही कसली रणनिती? खेळात हार जीतही होतच असते परंतु क्षमता असूनही चुकीच्या धोरणामुळे हार झाल्याने वाईट वाटले. यंदा इंग्लंड नंतर सर्वात जास्त जर का वर्ल्ड कप साठी फेव्हरेट मानले जात होते ते म्हणजे भारतीय संघाला.

आता तरी भारतीय निवड समिती यातून बोध घेईल अशी अपेक्षा आहे. असं ऐकलं आहे की कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची चौकशी होणार आहे. यातून काय निष्पन्न होणार कोणास ठाऊक? असो आपण भारतीय संघास वर्ल्ड कपचे दुःख विसरून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊ.