
बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने, कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले मागे राहतात. हे जाणवल्यावर बिहारमधील ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमारची ही कथा आहे.
कॉलेजमध्ये असताना रामानुजन मेडल पटकावणारा हा प्रज्ञावंत, आर्थिकदृष्ट्या खूप हलाखीत असतो. ऑक्सफर्डमध्ये प्रवेश मिळूनही तो तेथे जाण्यासाठीचे पैसे जमवू शकत नाही आणि सगळे गमावून बसतो. पापड विकून उदरनिर्वाह करतो. त्याला प्रस्थापित कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याची संधी मिळते व आयुष्यात चांगले दिवस आणता येतात. तो आपल्या साधन संपन्नतेकडे दुर्लक्ष करून ह्या वंचित मुलांसाठी त्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी पुढाकार घ्यायचा निर्णय घेतो. आणि केवळ तीस मुलं निवडून तो त्या मुलांना आयआयटीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय संघर्ष करतो, त्याची ही कथा आहे.
शिक्षण क्षेत्रातील वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दोन दशकापासून एक व्यक्ति करत असलेल्या प्राणघातक संघर्षाची कहाणी हा चित्रपट सांगतो.
जे धनाढ्य आहेत, ज्यांच्याकडे साधन आहे, ते लोक या साधनांचा वापर करून आपल्या पुढच्या पिढीला सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा आर्थिक बोजा न परवडणाऱ्या, आर्थिकदृष्ट्याही पददलित (अंडरडॉग) अशा वर्गाला यापासून पूर्णता बाजूला ठेवण्यात आले आहे.
संघर्ष मनाला भिडणारा आणि अतिशय (सुखद) धक्का देणारा आहे. चित्रपट संपायला येतो तेव्हा त्याचा शेवट पाहून आपण थक्क होतो, त्या थक्क होण्यासाठी अख्खा चित्रपट पहावा. कारण असे चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिलेच पाहिजे. सोबत मुलांनाही दाखवावा.
देशातील आर्थिक वर्गसंघर्ष, आर्थिक विषमता मुख्य प्रवाहातील सुपरस्टार नायकाद्वारे पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. ऋतिक रोशनने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे.
संवाद सुमारच आहेत, छायाचित्रण ठीक आहे आणि संगीतही उल्लेखनीय नाही. पात्रांची रचनाही फार विलक्षण म्हणता येईल अशी नाही. परंतु त्याची जीवनकथा इतकी जोरकस आहे की ती नीट मांडली गेल्याने, त्याचा संघर्ष संयमाने मात्र तीव्रतेसह मांडला गेल्याने, आपल्याला ती भावते.











