लसीकरण झाल्यास सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईत लोकल प्रवास सुरू करता येणार? – राजेश टोपे यांचे संकेत

सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहे. यामुळे मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणीने जोर धरला आहे. परंतु, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची बंदी कायम ठेवली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकलमधून सर्वांना प्रवास करण्याची परवानगी देण्यासंदर्भात विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात कोरोना लसीकरणाबाबत ठराव मांडत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील करोना परिस्थिती आणि मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भातही भाष्य केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. राज्यात दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणे, विकेंड लॉकडाऊन व मुंबईसारख्या शहरात लोकल बंद ठेवणे, असे पर्याय आपण स्वीकारले आहेत. पण आता मुंबईत लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु, राज्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तरच लोकल सुरू करता येईल, असे राजेश टोपे स्पष्ट केले आहे