ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. ‘ट्रॅजेडी किंग’ या नावाने बॉलिवूड मध्ये अनेक भूमिका अजरामर केल्यानंतर त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह सामान्य रसिकही आज हळहळला आहे. काही राजकीय दिग्गजांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे.

आज सकाळी 7.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. 29 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांचे निधन झाले.

दिलीप कुमार यांचे खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावरमध्ये झाला होता. दिलीप कुमार बॉलिवूडचे पहिले खान समजले जातात.

दिलीप कुमार यांनी 1944 साली आलेल्या ज्वार भाटा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिलीप कुमार यांनी 50 वर्षाच्या कारकीर्दीत 65 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.  त्यात अंदाज, आन, दाग, देवदास, आजादात, मुघले ए आझम गंगा जमुना, राम और श्याम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

1976 साली दिलीप कुमार यांनी पाच वर्षांसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर 1981 साली आलेल्या क्रांति चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. नंतर शक्ती, मशाल, करमा, सौदागर या चित्रपटात काम केले. 1998 साली किला हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.