IPL 2021, MI vs KKR: व्यंकटेश-राहुल यांनी केकेआरला दणदणीत विजय मिळवून दिला, मुंबईचा 7 गडी राखून पराभव

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या 34 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने एकतर्फी लढतीत मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. राहुल त्रिपाठीच्या नाबाद 74 आणि व्यंकटेश अय्यरच्या 53 धावांच्या जोरावर केकेआरने 156 धावांचे लक्ष्य अवघ्या 15.1 षटकांत पूर्ण केले. या विजयासह कोलकाताने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 6 गडी गमावून 155 धावा केल्या.

अबू धाबी येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 3 विकेट गमावून 15.1 ओव्हरमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले. या विजयासह मॉर्गनच्या नाईट रायडर्सने पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड केली. कोलकाताच्या विजयात वेंकटेश अय्यर (Vekatesh Iyer), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांची निर्णायक भूमिका राहिला. अय्यरने 53 धावा केल्या तर त्रिपाठी सर्वाधिक 74 धावा करून नाबाद राहिला. तसेच शुभमन गिलने 13 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स खेळाडूंनी बॅटनंतर बॉल आणि फिल्डिंगमध्ये निराशाजनक खेळी केली. गचाळ क्षेत्ररक्षणाचा जोरदार फटका मुंबईला बसला. खेळाडूंनी अनेक महत्वपूर्ण झेल सोडले तर फिल्डर्सने धावा लुटल्या. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वगळता अन्य खेळाडू विकेट्स घेत केकेआर (KKR) संघावर दबाव आणू शकले नाही.