
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणेचे आक्रमक नेतृत्व आणि त्याला सर्वच गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे भारतीय संघाने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 195 धावांत गुंडाळत मॅचवर घट्ट पकड मिळवली.
जसप्रीत बुमराहने 4 तर रवीचंद्रन अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने पदार्पणात प्रतिभेची चुणूक दाखवताना दोन विकेट्स घेतल्या.
रहाणेची दिमाखदार शतकी खेळीऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगसमोर भारतीय संघाची एकाक्षणी 64/3 अशी अवस्था होती. मात्र तंत्रशुद्ध कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं.
अजिंक्यने आधी ऋषभ पंत आणि नंतर रवींद्र जडेजासह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. चांगल्या गोलंदाजीसमोर, आव्हानात्मक खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ सादर करत रहाणेने 112 धावांची खेळी केली. जडेजाने 57 धावा केल्या.
प्रतिष्ठेच्या अशा बॉर्डर-गावस्कर मालिकेतल्या पहिल्या मॅचमध्ये 36 धावात ऑलआऊट झाल्याने भारतीय संघाला नामुष्कीला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय संघाची कसोटीतली ती नीचांकी धावसंख्या होती.
कसोटीवर चांगली पकड मिळवलेली असताना अवघ्या एका तासात भारताची फलंदाजी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले होते.
नीचांकी धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने डे-नाईट कसोटी गमावली. वनडे आणि ट्वेन्टी-20च्या आक्रमणामुळे भारतीय फलंदाजांना कसोटी प्रकारासाठी लागणारं तंत्रकौशल्य नाही अशी टीका झाली होती.
मेलबर्न क्रिकेट मैदानावरचा भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातला हा आठवा विजय आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड करत बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 विकेट्स गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला 70 धावांचे लक्ष्य मिळालं. मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले. मात्र पदार्पणावीर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोणतीही पडझड होऊ न देता दिमाखदार विजय साकारला. गिलने 35 तर रहाणेने 27 धावांची खेळी केली.











