
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) आयसीसी नॉनआऊट स्पर्धेत न्यूझीलंडवर (New Zealand) वर्चस्व कायम ठेवले आणि यंदा केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघावर 8 विकेटने मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अशाप्रकारे क्रिकेट विश्वाला टी-20 मध्ये एक नवा चॅम्पियन संघ मिळाला आहे. यासह न्यूझीलंडचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. यापूर्वी 2019 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना दुर्दैवाने अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. तसेच एकदिवसीय विश्वचषक 2015 च्या फायनल सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र तिथे देखील किवी संघाच्या हाती पराभवाची निराशाच आली होती. आणि यंदा सलग तिसरे आयसीसी फायनल स्पर्धा खेळणाऱ्या किवी संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. उल्लेखनीय आहे की विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलियाचे हे पहिलेच टी-20 जेतेपद आहे.











