
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर पडलं.
१६ बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा १०३ वर आला. मात्र कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. ठरावाच्या बाजूने केवळ ९९ मते पडल्याने अवघ्या चार मताने कुमारस्वामी सरकार कोसळलं. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडली. यावेळी भाजपचं एकही मत फुटलं नाही. जेडीएस-काँग्रेसचे १६ बंडखोर आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर बसपाचा उमेदवार तटस्थ राहिल्याने कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.
सरकार कोसळल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन भाजप नेते बी.एस. येदीयुरप्पा यांचे अभिनंदन केलं.






