Punjab Election 2022 : पंजाबमधील 117 जागासांठी मतदान पूर्ण

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election 2022) रविवारी मतदान (Voting) पार पडलं. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रविवारी सकाळी 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झालं. हाती आलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 5 पर्यंत 63.44 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत 1 हजार 304 मतदार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 93 महिला तर दोन ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये कैद झालं. या निवडणुकीचा निकाल अन्य चार राज्यांसोबत 10 मार्च रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगानुसार (Election Commission) पंजाबमध्ये 1 कोटी 2 लाख 996 महिलांसह एकूण 2 कोटी 14 लाख 99 हजार 804 मतदार आहेत.

पंजाबमध्ये यंदा बहुरंगी लढत

पंजाबमध्ये आज मतदान केंद्रांबाहेर सकाळी रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हजारो युवकांनी आज पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. काही लहान घटना वगळता आज पंजाबमध्ये शांततेत मतदान पार पडलं. दरम्यान, आम आदमी पक्षाने काही ठिकाणी ईव्हीएममध्ये खराबी असल्याची तक्रार केली, त्यामुळे काही काळ मतदान प्रभावित झालं. पंजाबमध्ये यावेळी काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल – बहुजन समाज पार्टी आघाडी, भारतीय जनता पार्टी – पंजाब लोक काँग्रेस आघाडी – शिरोमणी अकाली दल (संयुक्त) आणि विविध शेतकरी संघटनांची राजकीय आघाडी ‘संयुक्त समाज मोर्चा’ असा बहुरंगी सामना पाहायला मिळाला.

शिरोमणी अकाली दलाने यावेळी बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी करत निवडणूक लढवली. तर भाजपने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंह ढिंढसा यांच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्यासोबत आघाडी केली. तर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी पंजाबच्या अनेक शेतकरी संघटनांनी मिळून संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करत निवडणुकीत उडी घेतली. या निवडणूक संयुक्त समाज मोर्चाने हरियाणा भारतीय किसान यूनियन (चढूनी) चे नेते गुरनाम सिंह चढूनी यांच्या संयुक्त संघर्ष पार्टीसोबत हातमिळवणी केली होती.