एक दिवसीय सामन्याच्या मालिकेनंतर T 20 मालिकेत भारताचा वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप, तिसरी T 20 जिंकून मालिकेत निर्भेळ यश

भारताने (India) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा (West Indies) क्लीन स्वीप केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 184 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात विंडीज संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावाच करू शकला. परिणामी भारताने हा सामना जिंकून संपूर्ण दौऱ्यात किरोन पोलार्डच्या वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला. यापूर्वी एकदिवसीय मालिकेत देखील रोहित ब्रिगेडने वर्चस्वापुर्ण कामगिरी करून विंडीजचा सुपडा साफ केला होता. 

विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 बद्दल बोलायचे तर फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि दीपक चाहर रोहित ब्रिगेडच्या विजयाचे नायक ठरले. भारताकडून हर्षलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर दीपक चाहर, शार्दूल ठाकूरआणि वेंकटेश अय्यर यांनी दोन गडी बाद केले. सामन्याच्या सुरुवातीला झटपट विकेट गमावलेला संघ अडचणीत असताना सूर्यकुमार आणि वेंकटेशने 91 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमार यादवने यादरम्यान 31 चेंडू खेळून 65 धावा ठोकल्या. तर अष्टपैलू अय्यरने 35 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ईशान किशनने 34 धावांचे योगदान दिले. यापूर्वीच तीन सामन्यांची मालिका खिशात घेतल्याने यजमान संघ चार बदलांसह मैदानात उतरला होता. त्यापैकी एक म्हणजे कर्णधार रोहित शर्माने आपल्या सलामीच्या जागेचा त्याग करून युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला किशन सोबत सलामीला पाठवले. तर रोहित स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला मात्र धावा करण्यात फ्लॉप ठरला.

दुसरीकडे, या वर्षी भारत दौऱ्यावर निकोलस पूरनला वगळता किरोन पोलार्डच्या विंडीज संघाने प्रत्येक विभागात चाहत्यांची निराशा केली. पूरनने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे 61 आणि 62 धावानीच अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या, मात्र दुसऱ्या टोकाने साथ मिळत नसल्याने विंडीजना दौऱ्यावर एकही विजय मिळवता आला नाही.