
प्रगती फौंडेशनच्या “प्रोजेक्ट दिशा” अंतर्गत आणि B4U च्या सौजन्याने दुर्गम भागातील शाळांना सोलार पॅनल आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात अनेक शाळांना वीज उपलब्ध नाही तसेच शाळेतील मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत नाही, ही बाब अतिशय अस्वस्थ करणारी आहे. प्रगती फौंडेशन मुंबई (रजि.) याच्या प्रयत्नांतून आणि B4U या चॅनलच्या मदतीने प्रोजेक्ट “दिशा” अंतर्गत सुधागड तालुक्यातील चार जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आणि तेथे अखंड वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी सोलार पॅनल बसविण्यात आले.
तसेच विद्यार्थ्याना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी RO+UV फिल्टर पाणी उपलब्ध करून देणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे.


सुधागड तालुक्यातील चार शाळा अनुक्रमे राजीप शाळा मढाळी, राजिप शाळा तळई, राजिप शाळा बुरमाळी आणि राजिप शाळा भावशेत इत्यादी शाळांचा समावेश आहे.
दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता राजिप शाळा मढाळी आदिवासी वाडी येथे पाली सुधागडचे तहसिलदार श्री दिलीप रायान्नावर व संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण राणे यांच्या हस्ते सोलार पॅनल यंत्रणा आणि RO+UV फिल्टर वॉटर यंत्रणा उद्घाटन करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदना गावून आणि नृत्य कला कौशल्य सादर करीत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ किरण राणे यांच्या हस्ते सरस्वती देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालक श्री बालाजी राठोड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. तसेच आदिवासी भागात भेडसावत असलेल्या समस्यांबाबत मत मांडलं. याचबरोबर श्री राठोड यांनी प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात अनेक वर्षे सुरु असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात मागील चार-पाच वर्षांत अनेक सामजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.

यामध्ये शाळांना संगणक संच देणे, डिजिटल लॅब तयार करणे, शाळांना लायब्ररी करिता पुस्तकं वाटप करणे, विद्यार्थ्याना शाळेत मोफत वह्या, पुस्तके, पेन्सिल, वॉटरबॉटल, दफ्तरे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे, तसेच कोरोनाच्या काळात गरजूंना मोफत अन्न धान्य वाटप करणे इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश आहे.

“प्रोजेक्ट दिशा” अंतर्गत दुर्गम भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने प्रेरित होऊन पिण्यासाठी स्वच्छ पाणी, अभ्यासासाठी अखंड वीज आणि ईतर शैक्षणिक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तहसिलदार श्री दिलीप रायन्नावर यांनी प्रगती फाऊंडेशन आणि B4U या दोन्ही संस्थांचे ते करीत असलेल्या समाजपयोगी कार्याबद्दल कौतुक केले.

खऱ्या अर्थाने आदिवासीं पाड्यातील शाळांना मदतीची गरज आहे आणि ती गरज पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
“प्रॉजेक्ट दिशा” करिता प्रगती फाउंडेशनच्या सोबत B4U या चॅनलची मोलाची मदत लाभली आहे. असे प्रतिपादन डॉ किरण राणे यांनी केले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे प्रकल्प राबविले जातील याची हमी दिली.
स्थानिक सरपंच सादुराम साजेकर, समाज सेवक श्री शिरीष सकपाळ, सुधागड आदिवासी तालुकाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे आणि प्राध्यापक श्री संतोष भोईर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि B4U व प्रगती फाऊंडेशनचे आभर मानले.
मढाळी येथील कार्यक्रमात राजिप शाळा तळई शाळा मढाली आदिवासी वाडी शाळा भावशेत शाळा बुरमाली या 4 शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शीलोशी ग्रामपंचायत चे सरपंच सादूराम साजेकर सुधागड आदिवासी तालुकाध्यक्ष श्री चंद्रकांत वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनीत म्हात्रे व रोशन वाघमारे , समाजसेवक श्री शिरीष सकपाळ, पाली येथील पलिवाला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री संतोष भोईर, प्रगती फाउंडेशनचे राकेश वाणी, राजीप शाळा तळई चे शिक्षक श्री बालाजी राठोड आश्विनि पवार राजिप शाळा भावशेत चे शिक्षक अरुण काळे सर रूपा पांपटवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी राठोड आणि आभार सरपंच श्री साजेकर यांनी केले.






