
राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्या निवडणुकांत राज्यातील सत्तारूढ भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने मिळून वर्चस्व राखले. मात्र, संख्याबळात सत्ताधाऱ्यांच्या जवळपास पोहचून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीने टफ फाईट दिली. ग्रामपंचायतीचा निकाल पाहता भाजप शिंदे गट विरूद्ध माहाविकास आघाडी सामना अटीतटीचा झाला असच म्हणावं लागेल.
काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर ग्रामीण भागाचा नेमका मूड काय आहे याची चाचपणी होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकांचे महत्व वाढले. त्या निवडणुकांत सर्वांधिक ग्रामपंचायती आणि सरपंचपदे भाजपने जिंकली. भाजपने 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. त्या पक्षाचे 1 हजार 873 उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. सर्व पक्षांच्या कामगिरीचा विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकुणात दुसरा क्रमांक पटकावला. त्या पक्षाने 1 हजार 215 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. राष्ट्रवादीचे 1 हजारहून अधिक सरपंच निवडून आले.
भाजपचा सत्तेतील सहकारी असणाऱ्या शिंदे गटाने 842 ग्रामपंचायती जिंकल्या. त्या गटाचे 709 सरपंच विजयी झाले. कॉंग्रेसने 861 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. त्या पक्षाचे 657 सरपंच निवडून आले. ठाकरे गटाने 639 ग्रामपंचायतींची सत्ता मिळवली. त्या गटाचे 571 उमेदवार सरपंच बनले. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये इतर पक्ष किंवा आघाड्यांनी विजय मिळवला.
निकालांवरून राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याचा दावा त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो फेटाळून लावला. निवड झालेले सर्वांधिक सरपंच कॉंग्रेसचे आहेत. महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या सरपंचांची संख्या भाजपपेक्षा कितीतरी अधिक आहे, असा प्रतिदावा त्यांनी केला.






