
भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतची मर्सिडीज कार जळून अक्षरश: कोळसा झाली. ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या कपाळाला, पाठीला, गुडघ्याला दुखापत झाली आहे. या अपघातानंतर क्रिकेट जगतासह सर्वच स्तरातील मंडळींनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. अपघातावेळी ऋषभ पंत कार चालवत होता आणि कार वेगात होती, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता ऋषभ पंतचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिखर धवन ऋषभ पंतला गाडी हळू चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उत्तराखंडच्या रूरकी-नारसन सीमेवर हम्मदपूर परिसरात हा अपघात झाला. महामार्गावरच्या एका वळणावर ऋषभची कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रेलिंगला धडकली आणि अपघात झाला. यावेळी हरियाणा परिवहन महामंडळाच्या बसवर चालक आणि वाहकाचं काम करणारे सुशील मान आणि परमजीत सिंग यांनी ऋषभला कारमधून वेळीच बाहेर काढलं. त्यानंतर कारनं पेट घेतला. यासाठी पानीपत बस डेपोकडून या दोघांचा सत्कारही करण्यात आला आहे.
दरम्यान, ऋषभ पंतला चांगले वैद्यकीय उपचार मिळत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.






