चीनमध्ये करोनाच्या नव्या लाटेमुळे हाहाकार, चीन समोर आर्थिक संकट

चीनमध्ये करोनाच्या नव्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. करोना संसर्गामुळे अनेक प्रांतांमधील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या बातम्या समोर येत असतानाच या लाटेमुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसल्याचे संकेतही मिळत आहेत. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेंच्या यादीत असलेल्या चीनला करोनाचा आर्थिक फटका बसत असून आता चिनी लोकांकडे पैसेच उरलेले नाहीत असं चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी लोकांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे आधीच करोनाचं संकट त्यात केलेल्या कामाचे पैसे रखडले असे दुहेरी संकट चिनी नागरिकांसमोर आहे. सोशल मीडियावर सध्या औषधांसाठी लोक अगदी भीक मागत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. आता अनेक शहरांमध्ये चिनी लोक पगाराच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरत असल्याचंही पहायला मिळत आहे.

चीनमधील आर्थिक परिस्थितीची दाहकता दर्शवणारा एक व्हिडीओ २४७ चायना न्यूज या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक सुरक्षारक्षक आंदोलन करताना दिसत आहेत. या सुरक्षारक्षकांना पगार मिळालेला नसल्याने ते आंदोलन करत असल्याचा दावा केला जातोय. चीनमधील इतर अनेक शहरांमध्ये कंपन्यांनी पगार रखडवल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकजण पगाराचे पैसे द्यावेत या मागणीसाठी हातात बॅनर घेऊन रस्त्यावर प्रदर्शन करताना दिसत आहे. ही आंदोलने आणि कंपन्यांनी या संकटाची चाहूल लागल्यानंतर घेतलेली भूमिका पाहता चीन त्यांच्यावरील कर्ज संकटाची आकडेवारी लपवतंय की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

शून्य कोरोणा धोरणाअंतर्गत चीनने लागू केलेले निर्बंध डिसेंबरच्या सुरुवातीला उठवल्यानंतर देशात करोनाची लाट आली आहे. शून्य करोना धोरणाला लोकांनी केलेल्या विरोधामुळे सरकारने माघार घेत शून्य करोना धोरण मागे घेत निर्बंध शिथिल केले. मात्र या शून्य करोना धोरणाअंतर्गत घातलेल्या निर्बंधांमुळे आर्थिक फटका बसला.