
शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण या पक्षाच्या निवडणूक निशाणीवरील हक्काबाबत निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत मंगळवारी शिंदे गटाने शिवसेना पक्षातील घटनाबदल बेकायदा असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी ताब्यात घेतलेले शिवसेनेचे प्रमुखपद व अधिकार घटनाबाह्य असल्याचाही दावा करण्यात आला. दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला देऊन न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निवाडा देऊ नये, अशी मागणी लावून धरली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आयोगाने १७ जानेवारी रोजी ठेवली आहे.
शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर अर्ज दाखल करीत, शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण या निशाणीवर हक्क सांगितला आहे; तसेच ‘शिवसेना’ पक्षप्रमुख ही उद्धव ठाकरे यांची नियुक्तीही बेकायदा ठरवली आहे. मंगळवारी आयोगासमोर या प्रकरणातील पुढील सुनावणी झाली. या वेळी शिंदे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी व ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
शिंदे यांच्या पक्षाध्यक्षपदामुळे उद्धव यांचे पक्षातील पद संपुष्टात आले आहे, असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यातर्फे बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे लक्ष वेधले. ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक आयोगाने घाई करू नये. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत आयोगाने या प्रकरणात कोणताही निवाडा देऊ नये,’ अशी मागणी करतानाच, शिंदे यांनी पक्षाबाबत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचाही दावा केला.






