
*माजी मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांच्या शिवसेनेत प्रवेश*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न*
*मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी स्वीकारायला तयार असल्याची भूषण देसाई यांची ग्वाही*
मुंबई :- ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे हातात भगवा घेत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली शिवसेनेची सूरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळेच पक्षप्रवेश करत असल्याचे भूषण देसाई यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही दबावाखाली किंवा चौकशीला घाबरून पक्षप्रवेश करत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे भूषण देसाई यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नमूद केले.
याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.






