
बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ या कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आहे. या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्वत: उपस्थित होतो असंही सांगितलं आहे.
बाबरी प्रकरणासंदर्भात या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येत शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे प्रश्न उपस्थित केले. “त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
विधानानंतर निलेश खरे यांनी पुन्हा एकदा, “बाबरी पाडली ते शिवसैनिक नव्हते?” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, “बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं. मी बाहेर पडलो तेव्हा अयोध्येच्या रस्त्यावर,” असं सांगितलं. तसेच पुढे, “अशा वातावरणात काम केलेले आम्ही. त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणून तुम्ही काय तुमचे चार सरदार तिथे पाठवले होते का?” असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे
लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर लपलेले होते. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. बाबरी शिवसैनिकांनीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत. भाजपचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता स्वत:चे थोबाड कोणत्या जोड्याने फोडून घेणार आहात?, असे विचारत चंद्रकांत पाटली यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आताचे पंतप्रधान हे हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचेही नाव समोर आले नव्हते. संतापजनक गोष्ट ही आहे की जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपून बसले होते. कुणीही बाहेर यायला तयार नव्हता. सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून जाहीर केले होते की बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता. ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. संजय राऊत यांचा फोन आला होता. बाळासाहेबांना मी सांगितलं की बाबरी पाडली. बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता. त्यावेळी ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्व? असं नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही.
दरम्यान, राम जन्मभूमीच्या आंदोलनात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे त्यांची व्यक्तिगत मत भाजपची भूमिका नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.






