डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: मुंबई पुराभिलेखागाराची स्थित्यंतरे आणि अजूनही आधुनिक इमारतीच्या प्रतिक्षा चालूच – भाग 12

*मुंबई पुराभिलेखागाराची स्थित्यंतरे आणि अजूनही आधुनिक इमारतीच्या प्रतिक्षा चालूच*

मुंबई पुराभिलेखागाराची निर्मीती सन 1821 साली झाली. विल्यम क्राप्ट हा पहिला रेकॉर्ड किपर होता व अभिलेख एल्फिन्स्टन सर्कलमधील सेक्रेटरीच्या तळमजल्यावरील जागेत होते. रेकॉर्ड दिवसेंदिवस वाढत होते म्हणून ते नव्याने बांधलेल्या टाऊन हॉलच्या तळमजल्यावर दाटीवाटीने ठेवण्यात आले. 1874 मध्ये नवीन सचिवालय सध्याच्या सीटी सिव्हिल कोर्टाच्या ठिकाणी बांधण्यात आल्यावर सचिवालयाच्या जवळच अभिलेख असावेत या संकेतानुसार ते सचिवालयातील मेडिकल स्टोअरच्या जागेत दाटीवाटीने ठेवण्यात आले.

अभिलेखांसाठी एक स्वतंत्र सुसज्ज इमारत असावी ही सुचना पुढे आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांनी इमारत बांधण्याची परवानगि दिल्यानंतर सध्याची एल्फिन्स्टन काॅलेजची इमारत खास अभिलेखांसाठीच निर्माण करण्यात आली तसा शिलालेख मुख्य प्रवेशद्वारावर आहे. पण काही दिवसातच चिंचपोकळीला असलेले एल्फिन्स्टन काॅलेज पहिल्या मजल्यावरील एक बाजू व दुसर्‍या मजल्यावरील दोन्ही बाजू देण्यात आल्या.सार्वजनिक बांधकाम विभाग आदेश क्रमांक 520 / ?सी डब्ल्यु 2225 dt.21 December 1889 च्या अन्वये याची कोणास किती जागा देण्यात आली हे स्पष्ट करण्यात आले आहे.

एल्फिन्स्टन काॅलेजची इमारत मुंबई इलाख्याचे वास्तुविशारद खान बहादूर मच्चरजी मर्झबान यांनी तयार केलेल्या आरिखड्या प्रमाणे बांधण्यात आली आणि तिचे उद्घाटन दिनांक 4 February 1889 रोजी तत्कालीन गव्हर्नर डोनाल्ड जेम्स लाॅड्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.ही इमारत गाॅथीकवास्तुशिल्प पध्दतीची असून चौकोनी भूभागाच्या तीनही बाजूवर बांधण्यात आली आहे. इमारतीच्या दर्शनी भागाच्या उत्तर– दक्षिण बाजूस त्रिकोणाकृती घुमट असून त्याच्या चारी बाजूस चार टोकदार दगडी मिनार आहेत.

या पुराभिलेख विभागासाठी स्वतंत्र सुसज्ज आधुनिक इमारत असावी म्हणून तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय अशोक चव्हाणसाहेबांनी मंजूरी देऊन इमारतीचा प्लान मंजूर केला.गव्हर्न्मेंट वसाहती बांद्रा पुर्व कडील भूखंडावर पुराभिलेख विभागाचा 7/12 वर नावही लागले.बजेट मध्ये दोन कोटीची तरतूद करण्यात आली पण दुर्दैवाने सरकार बदलले आणि या इमारतीचा प्रश्न थंडावला. मी सुध्दा 2011 मध्ये निवृत्त झालो. इमारत न झाल्याची खंत कायम राहीली आहे.

ही इमारत नेमकी कोणासाठी बांधण्यात आली यावर एल्फिन्स्टन काॅलेज आणि पुराभिलेख विभाग यांच्यात वादविवाद निर्माण झाल्यावर आमच्या मदतीला हे ऐतिहासिक दस्तावेज धावून आले.यावरून अभिलेखांचे महत्त्व द्विगुणित होत आहे.अभिलेख हे निर्भीड असतात आणि सत्य तेच सांगत असतात.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.  मोबाईल 835 595 7451.

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar