
1857 स्वातंत्र्यसमरातील कोल्हापूर संस्थानचा योगदान काहीसा झाकोळून गेलेला भारत निर्मितीचा इतिहास- – – –
1857 चे स्वातंत्र्यसमर हे भारतीय इतिहासातील फार मोठी क्रांतिकारक घटना होती आणि त्यामध्ये कोल्हापूर संस्थानाचा लक्षणीय योगदान होते पण इतिहासकारानी त्यावर फारसा प्रकाश झोत न टाकल्याने खूप ऐतिहासिक दस्तावेज असूनही तो झाकोळून गेला आहे.
भारत निर्मितीचा इतिहास
इंग्रजानी 1844 साली दाजी कृष्ण पंडित यांची मुख्याधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यांने आपल्या परीने प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न केला पण छत्रपतीच्या घराण्याशी एकनिष्ठ असलेले सैनिक आणि पदाधिकारी असंतुष्ट होते यातूनच भुदरगड व सामानगड येथे बंडाची ठिणगी पडली पडल्यावर हे बंड मोडण्याची कामगिरी पोलिटिकल एजंट रीव्हजकडे देण्यात आली त्याने ते बंड कसेबसे थांबवले आणि त्यासाठीचा आलेला पंधरा लाखाचा खर्च जनतेकडून वसुल करण्यात आला. त्यामुळे जनक्षोभात अधिकची भर पडली होती. आग धुमसत होती. याविरुद्ध सामानगडाच्या उठावाचे मुख्य सूत्रधार मुंजाप्पा नायक तसेच सुभाना निकम व बाबाजी आयरेकर होते.
या उठावाला प्रेरणा देणाऱ्या प्रमुख व्यक्तीमध्ये बाबासाहेब महाराजांच्या राणी सईबाई उर्फ दिवाणसाहेब या होत्या. याचे मुख्य कारण म्हणजे कोल्हापूरच्या जनतेकडून राजघराणे वाढती बजबजपूरी , अनागोदी कारभार, रूढी पंरपंरावर होत असलेले अन्याय, अत्याचार याला जनता भडकली होती. त्यात छत्रपतींचे सख्खे बंधू चिमासाहेबांनी उघड उघड उडी घेतल्याने ठिणगीचे रूपांतर आता वणव्यात होऊ लागला होता.
1857 चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर होतेच. युध्दाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे, तात्यासाहेब टोपे , झांशीची राणी लक्ष्मीबाई हे आघाडीवर होतेच अन् आता कोल्हापूर राजघराण्यानेही सहभाग घेतला होता. सुरुवात तर जोरदार झाली होती पण योग्य समन्वय नसल्याने आणि बाबासाहेबांनी तटस्थ राहिल्याने या उठावाची आग थंड होत गेली कोल्हापूर इन्फंट्रीचे शिपाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने इंग्रज युध्द प्रमुख जेकबला यश मिळाले.

शूरपणाने झुंज देणाऱ्या चिमासाहेबांना चौकशीस बोलावून त्यांचे म्हणने काही एक ऐकून न घेता त्याना अटक करून थर्ड ड्रगन गार्डस सदन मराठा हाॅर्स व कोल्हापूर लाईफ इन्फ्रंटीच्या पहार्यात कोणतेही न्यायालयीन चौकशी न करता कराचीला पाठविण्यात आले. तेथे ते अकरा वर्ष इंग्रजांच्या बंदिवासात होते.शेवटी त्यांचे 1869 मध्ये निधन झाले. त्यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला पण त्यास नकार मिळाल्यावर या तेजस्वी , मानी स्त्रिने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली. या लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यवीरांचे आतोनात हाल करण्यात आले व त्यातील अनेकांना अंदमान निकोबार येथे पाठविण्यात आले. यासर्वानी स्वातंत्र्यसमरात प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या अनाम स्वातंत्र्य वीरांना मानाचा मुजरा !
या गडकरांच्या बंडापासून ते चिमासाहेबांनी निर्भीड पणे भाग घेऊन जो भारत मातेच्या शृंखला तोडण्यात भाग घेतला आणि त्यांच्याबरोबर अनेकांनी भाग घेतला त्याची इत्यंभूत माहीती देणारे अव्वल ब्रिटिश रेकॉर्ड राष्ट्रीय पुराभिलेखागार नवी दिल्लीत सुरक्षित जतन करून ठेवण्यात आली आहेत. म्हणून मी सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे काहीसा झाकोळून गेलेला इतिहास या कागदपत्रांद्वारेच अधिक प्रकाशात आणता येईल.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन , मोबाईल ‐‐835 595 7451












