क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात

भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड(BCCI) ने क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ ७ वर्षाची आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढीलवर्षी १३ सप्टेंबर २०२० साली संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे. १३ सप्टेंबर २०१३ साली श्रीसंतवर मॅच फिक्सिंगमुळे आजीवन बंदी घालण्यात आली होती.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतवरील आजीवन बंदी सुप्रीम कोर्टाने मार्च २०१९ रोजी हटवली होती. बीसीसीआयकडे दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, श्रीसंतवरील आजीवन बंदी ही फार मोठी शिक्षा आहे. बीसीसीआयने याचा पुनर्विचार करावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरश्रीसंत म्हणाला की, मी लिएंडर पेसला आदर्श मानतो. तो ४५ वर्षाचा असताना ग्रँड स्लॅम खेळू शकतो, आशीष नेहरा ३८ व्या वर्षी वर्ल्डकप खेळू शकतो, तर मी का नाही?, मी तर केवळ ३६ वर्षाचा आहे.