
नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने सीबीआय आणि ईडीने आज चिदंबरम यांचे घर गाठले. मात्र चिदंबरम घरी नसल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणांना माघारी परतावं लागलं आहे. सीबीआय आणि ईडीची टीम चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने आज चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळून लावली. तसेच त्यांना तीन दिवसांची सवलत देण्याची मागणीही फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर आज सुनावणी करण्यास नकार दिला.






