चिदंबरम यांना 26 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

नवी दिल्ली: तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयनेचिदंबरम यांना साडे तीन वाजता राउज अॅव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मला वाटलं मोठ्या कोर्टात मला आणलं जाईल, अशी मिश्किल टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याचंही सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने चिदंबरम यांची २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, कोर्टाने चिदंबरम यांना दररोज अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.