चिदंबरम यांची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: मंगळवार सायंकाळपासून ईडी आणि सीबीआयला सापडत नसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अखेर २७ तासांनंतर मीडिया समोर आले. रात्री उशिरा काँग्रेस कार्यालयात दाखल होऊन त्यांनी त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतंही आरोपपत्रं दाखल करण्यात आलेलं नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवल्या गेलं आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचं पालन करावं, असं चिदंबरम म्हणाले. हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही, असं स्पष्ट करतानाच आपल्याला फरार म्हटलं जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.