
औरंगाबाद: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवेयांचा विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस आघाडीचे उमदेवार भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मते मिळाली. यावरुन या निवडणुकीत विरोधकांचे मोठ्या प्रमाणावर मतदान फुटल्याचे स्पष्ट झाले.
दानवे यांना मिळालेल्या मतदानावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएम पक्षाचेही मतदान दानवेंना मिळाले हे स्पष्ट होते. शिवसेना- भाजपचे २९२ मतदान होते तर सुमारे ४० ते ४५ अपक्ष तसेच इतरांचा पाठिंबा असे एकूण ३३३ मतदानाचे गणित महायुतीचे होते. मात्र, तब्बल १९१ अधिकचे मतदान घेऊन दानवे यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणली.
यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.






