
मुंबई: नामवंत बिस्कीट कंपनी पारले आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने बिस्किटांवरील जीएसटीच्या दरात कपात न केल्यास आम्हाला आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करावे लागेल, असा इशारा या कंपनीने दिला आहे. मागणी व विक्री घटल्याने या कंपनीची आर्थिक आघाडीवर पीछेहाट होत असताना १८ टक्के जीएसटीची त्यात भर पडली आहे.
जीएसटी लागू होण्यापूर्वी बिस्कीटांवर १२ टक्के कर आकारला जात असे. मात्र जीएसटीच्या रचनेत बिस्कीटांसाठी १८ टक्के जीएसटी निश्चित करण्यात आल्याने उत्पादक कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी जवळपास सर्व कंपन्यांनी बिस्कीटांच्या किमतीत वाढ केली. मात्र त्यामुळे विक्रीमध्ये घट नोंदवली जात आहे. त्यामुळे महागड्या बिस्कीटांवर १८ टक्के व परवडणाऱ्या बिस्कीटांवर पाच टक्के जीएसटी आकारला जावा, अशी मागणी या उत्पादकांनी केली आहे.
पार्ले जी, मोनॅको, मारी आदी असंख्य लोकप्रिय बिस्कीटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीत एकूण एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. १० हजार कोटी रुपयांची विक्री उलाढाल असणाऱ्या या कंपनीच्या मालकीची १० उत्पादन केंद्रे आहेत. तसेच, १२५ बाह्यप्रकल्पांमध्येही बिस्कीटांचे उत्पादन होते. पार्ले बिस्कीटांच्या एकूण विक्रीपैकी अर्ध्याहून अधिक विक्री ही ग्रामीण भागांत होत असून वाढीव जीएसटीमुळे या भागांतील विक्रीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे.











