१० वी फेरपरीक्षेचा निकाल उद्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (१० वी) निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थाळावर हा निकाल ऑनलाइन जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून या निकालाची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या नऊही विभागीय मंडळात एकाच वेळी जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत संबंधित विभागीय मंडळात अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची प्रत / गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना जुलै २०१९ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन वेळेत पाच दिवसात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.