
मुंबई: सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षात राजकीय मेगा भरती चालू आहे. परवा भाजपाच्या मेगा भरती भाग तीन नंतर आज शिवसेनेनेही मेगा भरती केली आहे.
कोकणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वजनदार नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक भास्कर जाधव यांनी आज मातोश्री वर शिवसेनेत प्रवेश केला. तसेच खाकी वर्दी खाली ठेवून राजकीय पटलावर विरोधी पक्षाचे एन्काऊंटर करण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार राहिलेले व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव तब्बल १५ वर्षांनंतर स्वगृही परतले. उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या हातात शिवबंधन बांधले.
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे नमूद करत जागावाटपाबाबत यंदा मी वेगळा मार्ग सूचवला आहे. यावेळी शिवसेनेची यादीही तुम्हीच तयार करून द्या. मी ती यादी शिवसैनिकांपुढे ठेवेन, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे उद्धव म्हणाले आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

आज सायंकाळी प्रदीप शर्मा यांनी भगवा ध्वज खांद्यावर घेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मी काही मागितलं नाही आणि आकडेवारीवर मी काहीच बोलत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात ठरलंय. निवडणूक जाहीर होऊ द्या, तुम्हाला सर्व कळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रदीप शर्मा यांच्या कार्याचंही कौतुक केलं. एक कर्तव्य दक्ष अधिकारी शिवसेनेत आला याचं समाधान आहे. पोलीस सेवेत त्यांनी निष्ठापूर्वक काम केलं. आता नव्या राजकीय कारकिर्दीत ते निष्ठेने काम करतील. आतापर्यंत त्यांची गन बोलली, आता त्यांचं मन बोलेल, असं त्यांनी सांगितलं.






