
नवी मुंबई: सीवूड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून ७ भाविक जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सीवूड चा महाराजाची मिरवणूक सीवूड उड्डाणपुलावरून खाली उतरत असतानाच मध्यरात्रीनंतर १२.३०च्या सुमारास ही घटना घडली. या पुलावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला गणेशमूर्तीचा वरचा भाग लागला आणि तार तुटून ही दुर्घटना घडली. मिरवणुकीतील सात भाविकांना विजेचा धक्का बसला.
सात पैकी चार जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील एका कार्यकर्त्यावर डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर दोन कार्यकर्त्यांवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






