गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका – शरद पवार

सोलापूर: येथे जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर सडकून टीका करतानाच कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं कामही केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच पवार यांनी सोलापूरमधील आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच दिवसांनंतर मी सोलापूरकरांसमोर बोलायला उभा राहिलो आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. १९६५ साली मी तरुणांचं नेतृत्व केलं. तेव्हा सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती, अशी आठवण पवारांनी सांगितली.

राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या लोकांची नावं कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजाडणाऱ्यांची काळजी घेऊ या. गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.