
ह्यूस्टन: टेक्सास राज्याला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही, रविवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, हा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ह्यूस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये ही सभा होत आहे. या सभेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहात आहेत. भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्ष शृंगला यांनी शुक्रवारी या स्टेडियमची पाहणी केली. आयोजकांनी शुक्रवारी कार रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये भारत आणि अमेरिकेचे ध्वज घेतलेल्या २००पेक्षा जास्त कार सहभागी झाल्या होत्या. आयोजक आणि स्वयंसेवक यांनी ‘नमो अगेन’चे टी शर्ट घातले आहेत. कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देताना ‘टेक्सास इंडिया फोरम’च्या प्रवक्त्या प्रीती डावरा म्हणाल्या, ‘अमेरिका आणि भारताच्या संस्कृती व ऐक्याचा हा महासोहळा आहे. या सभेमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे दृढ होत आहेत, हे मोदी सांगणार आहेत. त्याशिवाय, दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर भारताच्या विकासाविषयी त्यांची दृष्टी कशी आहे, ही गोष्टही ते सांगतील, त्याकडे अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या ३० लाख भारतीयांचे लक्ष आहे.’






