
नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात “या अधिकाऱ्यांचे करायचे काय
खाली डोकं वरती पाय..”, “परत करा आमचे फुटपाथ, नका करू हाथ साफ…”, “श्रीमंत आमची पालिका, मग रस्त्यांचे हाल का ?….”, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…..”, “बंद करा भ्रष्टाचार फुटपाथ वर आमचा अधिकार….” या घोषणा देऊन मनसैनिकांनी शिट्ट्या वाजवून परिसर दणाणून सोडला.

गेल्या कित्येक दिवसांपासून नेरुळ व जुईनगर विभागातील नागरिकांना विविध समस्यांनी पछाडले आहे. या नागरी समस्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, उखडलेले पदपथ, गटारांची तुटलेली झाकणे, मोडकळीस आलेली गटारे, रस्त्यांवर असलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई, बंद अवस्थेतील पथदिवे व हायमास्ट, दुकानदारांनी अवैधरित्या अडवलेली मार्जिनल स्पेस, पदपथ व रस्ते अडवून बसलेले अनधिकृत फेरीवाले व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कधीही न पाहवयास मिळणारी औषध व धूर फवारणी, उद्यानांची व मैदानांची झालेली दुरावस्था, अनधिकृत गॅरेजेस व त्यांची रस्त्यांवरील बेवारस वाहने, रमेश मेटल क्वारी येथे नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा या व अशा अनेक समस्यांमुळे नागरिक बेजार झाल्याचे मनसे शहर सह-सचिव शशिकांत कळसकर व विनय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या नागरी समस्यांकडे महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. यामध्ये कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे देखील असल्याची शंका मनसेने व्यक्त केली आहे. तरी या समस्या येत्या दहा दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास महापालिका व अधिकाऱ्यांविरोधात खळ-खट्टयाक आंदोलन करण्याचा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे व सचिव सचिन कदम यांनी दिला आहे.
याप्रसंगी मनसेची आक्रमकता पाहून विभाग अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी मनसेच्या विविध शिष्टमंडळात नेरुळ विभाग कार्यालयात उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सचिन कदम, विलास घोणे, अभिजित देसाई, विनय कांबळे, दिनेश पाटील, आरती धुमाळ, अनिता नायडू, प्रिया गोळे, देवा प्रसाद, अनिकेत भोपी, उमेश गायकवाड, योगेश शेट्ये, नितीन नाईकडे, अक्षय भोसले, कलाम पांगारकर, विद्या इनामदार, दीपाली धौल, संदेश डोंगरे, संपरित तुर्मेकर, मनीषा नांगरे, निखिल गावडे उपस्थित होते







