ज्यांनी विचाराशी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवा – शरद पवार

साताऱ्यात राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

सातारा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साताऱ्यात विराट सभा घेऊन उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पवारांनी आधी साताऱ्यात जोरदार रॅली काढली. त्यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शरसंधान साधलं. विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकविण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली, त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, असं सांगतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. 

मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही तरुणांच्यापाठी ताकद उभी करावी, असं लोकांचं मत आहे. त्यामुळे आम्ही तरुणांच्या पाठी ताकद उभी करणार! मी २० तास काम करेल, पण चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?, असा सवाल करत उदयनराजेंनी स्वाभिमान गहाण टाकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशकडून भारतावर हल्ले झाले. साताऱ्यातील जवानांनी हे हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र घडवणारे यशवंतराव चव्हाणही याच मातीतले आहेत. त्यामुळे हा जिल्हा विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं सांगतानाच ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्याला धडा शिकवा, असं आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला.