सातारा लोकसभा पोटनिवडणूकची तारीख जाहीर

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही हे स्पष्ट आहे. याच कारणामुळे साताऱ्याची निवडणूक रंगतदार होईल का याबाबत शंका निर्माण होत आहे. ही निवडणूक नंतर घोषित होण्याची घोषणा या पूर्वी झाल्याने राजीनामा दिलेले उदयनराजे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही निवडणूक विधानसभेसोबतच घ्यावी असा स्वत: उदयनराजे भोसले यांचा आग्रह होता. शेवटी तसेच झाल्याने आता विधानसभा निवडणुकीचा सर्वच फायदे उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मिळणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे.