
मुंबई: युतीच्या चर्चेचं घोडं जागा वाटपावर अडल्याने शहा यांनी हा दौरा रद्द केल्याचं सूत्रांनी सांगितलं. शहा यांनी दौरा रद्द केल्यानं शिवसेना-भाजपाची युती होण्याची शक्यता कमी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
भाजपने ११० जागांचा दिलेला प्रस्ताव शिवसेनेने नाकारल्याने युती होण्याची शक्यता कमी असल्याचं समजूनच शहा यांनी शिवसेनेचा उल्लेख भाषणात टाळला होता, असं सांगण्यात येतं. दरम्यान, २६ सप्टेंबरपर्यंत युतीवर तोडगा निघणार असल्याची शक्यता असल्याने शहा यांचा २६ सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. या दौऱ्यात शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र युतीच्या जागा वाटपाचं घोडं अडल्याने आणि शिवसेनेनेही २८८ जागांवर उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू केल्याने ही चर्चा युतीची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच शहा यांनी मुंबई दौरा रद्द केल्याचं सांगण्यात येतं.
काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आजी-माजी आमदारांना जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिल्यामुळेही युतीची चर्चा अडल्याचं कारण सांगण्यात येतं. तर काही राजकीय निरीक्षकांच्या मते २८ सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपत असल्याने ३ ऑक्टोबर रोजी म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या एक दिवस आधी युतीची घोषणा करण्यात येणार येईल.






