
मुंबई: ‘ईडी’च्या चौकशीनंतर राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्ष टिकवायचा असेल तर निवडणूक लढलीच पाहिजे, असा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळं मनसेमध्ये त्याबाबत गांभीर्यानं खल झाला. अखेर राज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी तशी घोषणाही केली. मनसे फक्त निवडणूक लढणार नाही, तर जिंकणार, असं त्यांनी आज स्पष्ट केलं.
मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. तसंच, ५ ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडेन, असंही स्पष्ट केलं.
वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. ‘बरेच दिवस मी बोललो नव्हतो. आता सुरुवात केली आहे. सगळं सांगेन. महाराष्ट्राच्या जनतेपुढं सांगेन,’ असं राज यांनी सांगितलं. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.






