नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर लढणार- नारायण राणे

मुंबई : नारायण राणे यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नितेशला भाजपकडून कणकवलीतून उमेदवारी मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. नितेशचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत असेल. तो कणकवलीतूनच निवडणूक लढवणार आहे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याबाबत विचारणा केली असता, येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

नितेश राणे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. तेव्हा भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र तेथील सगळी गणितं बदलली असून काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नितेश राणे यांचे भाजपच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा आहे. शिवसेनेच्या विरोधामुळे राणे कुटुंबीयांचा भाजप प्रवेश लांबला असला तरी नितेश यांना भाजपची उमेदवारी मिळेल, याची पूर्ण खात्री नारायण राणे यांना आहे. त्यामुळेच भाजपच्या दुसऱ्या यादीची त्यांना प्रतीक्षा आहे.