Mutual Fund: निवृत्त जीवनासाठी म्युच्युअल फंड

भारतात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी या फंडांकडे निवृत्तीनंतरचे उत्पन्न साधन म्हणून अद्यापही पाहिले जात नाही. निवृत्तीनंतरच्या निर्वाहासाठी म्युच्युअल फंडांचा उपयोग कितपत होऊ शकेल, याबाबत गुंतवणूकदार साशंक असल्याचे दिसते. म्हणून अनेक फंड हाऊसेसनी हे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल, अशा योजना दाखल केल्या आहेत. या योजना पारंपरिक निवृत्ती योजनांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात पारंपरिक योजनांची जागा फंडांनी घेतल्याचे चित्र दिसू शकेल. म्युच्युअल फंडाच्या मदतीने निवृत्तीनंतरच्या नियमित खर्चाची गरजही पूर्ण होऊ शकते. गुंतवणूकदार निवृत्‍तीनंतर त्‍यांच्‍या मासिक खर्चासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्‍यासाठी म्‍युच्‍युअल फंड्सची मासिक लाभांश पेआऊट योजना किंवा एसडब्‍ल्‍यूपी (सिस्‍टीमॅटिक विथड्रॉवल प्‍लॅन) किंवा आरडब्‍ल्‍यूपी (रेग्युलर विथड्रॉवल प्‍लॅन) अशा वैशिष्‍ट्यांचाही आधार घेऊ शकतात. एसडब्‍ल्‍यूपी किंवा आरडब्‍ल्‍यूपी गुंतवणूकदारांना फिक्‍स्‍ड विथड्रॉवल आणि अॅप्रिएशन विथड्रॉवल अशा दोन पद्धतीने फंड खात्‍यामधून नियमित अंतराने ठरावीक व पूर्वनिश्चित पैसे काढण्‍याची सुविधा देते. यामुळे निवृत्त व्यक्तीला अधिक परताव्यासह नियमित उत्पन्न मिळू शकते आणि त्याला चांगल्या जीवनशैलीमध्ये जगता येते.