भाजपाचा शिवसेनेला 13-26 चा फॉर्म्युला, सोबत उपमुख्यमंत्री पदाची ऑफर

मुंबई: विधानसभा निकाल लागून आठवडा लागला तरी भाजपा – शिवसेना यांचं अजूनही काही जमत नाही. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीचा दाखला देऊन अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. भाजपाने मात्र स्पष्ट शब्दात नकार दिल्याने सरकार स्थापन अजूनही रेंगाळत आहे.

पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं म्हणत फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्वच्छपणे मांडली आहे. यानंतर आता भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे.

मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. पण उपमुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा होऊ शकते, असं भाजपानं नव्या प्रस्तावात म्हटलं आहे. भाजपानं शिवसेनेला 13-26 चा फॉर्म्युला दिला आहे. यानुसार शिवसेनेला एकूण 13 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. तर भाजपा 26 मंत्रिपदं स्वत:कडे ठेऊ शकते. चार महत्त्वाची मंत्रिपदं शिवसेनेला देण्याची भाजपाची तयारी नाही. महसूल, नगरविकास, गृह, अर्थ मंत्रालयं भाजपा आपल्याकडेच ठेवेल.

आदित्य यांना लगेच उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते.