
जादूटोण्यावर कायद्याने बंदी असूनही कळव्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार
उघडकीस आला आहे. आर्थिक भरभराटीसाठी मानवी कवटी आणून ठेवणाऱ्या कळव्यातील एका व्यक्तीसह
उल्हासनगरमधील पुजारी आणि स्मशानभूमीत काम करणारा एक कर्मचारी अशा तिघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी एकूण दोन मानवी कवट्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
कळव्यातील मफतलाल झोपडपट्टी येथील फक्रुद्दीन चाळीतील एका
खोलीत मानवी कवटी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळवा पोलिसांनी शुक्रवारी अचानक या
खोलीमध्ये छापा टाकला. यावेळी खोलीत एक कवटी सापडली. राजू रामअवतार शर्मा (४५) यानेच
ही कवटी घरात आणून ठेवली होती. केटरर्सच्या कामानंतर सलूनचा व्यवसाय उघडूनही भरभराट
होत नव्हती. त्याचदरम्यान कामानिमित्त शर्मा उल्हासनगरला गेला होता. त्यावेळी उल्हासनगरमधील
महाराज तथा पुजारी कैलास बाबूलाल हटकर याच्याशी शर्माची ओळख झाली होती. घरात मानवी
कवटी ठेवल्यास भरभराट येईल, तसेच त्रासही कमी होईल असे सांगण्यात
आले होते. त्यानंतर शर्माने पुजाऱ्याकडून ६ हजार रुपयांमध्ये मानवी कवटी घेतली होती.
मागील तीन महिन्यांपासून ही कवटी शर्माच्या घरात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक
शिरीष यादव यांनी दिली.









