
मुंबई: प्रत्येक बँकेच्या शाखांच्या कामकाजाची वेळ वेगवेगळी असल्याने ग्राहकांचा संभ्रम होत होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी बँकांच्या वेळा एकसारख्या असाव्यात, अशी सूचना अर्थ मंत्रालयाने केली होती. त्यानंतर या वेळा निश्चित करण्यासाठी बँकांची शिखर संघटना असणाऱ्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने पुढाकार घेतला. त्यानुसार नवे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. परिणामी, देशभरातील बँकांचे कामकाज निर्धारित वेळेत चालेल. बँकांच्या शाखांच्या वर्गवारीनुसार बँकांचे कामकाज तीन वेळांमध्ये होणार आहे.
आज, शुक्रवारपासून बँकांचे वेळापत्रक बदलणार असून, तीन निर्धारित वेळांमध्ये बँकामध्ये कामकाज चालणार आहे. सकाळी ९ ते ३, १० ते ४ आणि ११ ते ५ या वेळांमध्ये बँका कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे या नव्या वेळापत्रकानुसारच खातेदारांना व्यवहार करावे लागणार आहेत.
नव्या निर्णयानुसार निवासी क्षेत्रातील बँका ९ ते ४ या वेळेत सुरू राहतील. ९ ते ३ या वेळेत ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतील. व्यापारी भागातील शाखा ११ ते ६ या वेळेत सुरू राहतील. या शाखांच्या ग्राहकांना ११ ते ५ या वेळेत आपले व्यवहार करता येतील. उर्वरित परिसरातील शाखा १० ते ५ दरम्यान सुरू राहतील. त्यांच्या ग्राहकांना १० ते ४ या वेळेत व्यवहार करू शकतील.











