अयोध्या निकाल: विविध प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिरच असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

विविध प्रतिक्रिया पुढील प्रमाणे

RSS सरसंघचालक मोहन भागवत : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करतो. देशाची एकात्मता व बंधुत्वाचं परिपालन करणारा हा निर्णय आहे. जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून याकडं पाहू नका,’ अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.

राज ठाकरे : ‘हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आता लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी आणि ‘रामराज्य’ देखील यायला हवं, असा चिमटाही त्यांनी सरकारला काढला आहे.

काँग्रेस: अयोध्या प्रकरणाच्या निकालामुळं राम मंदिराचे दरवाजे खुले झाले, हे खरेच आहे. मात्र, त्याचबरोबर या निकालामुळं सत्तेच्या भोगासाठी श्रद्धेचं राजकारण करण्याचे मार्ग बंद झाले आहेत,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसनं अयोध्या निकालानंतर दिली आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल न्यायालयानं दिला आहे. या निकालामुळे वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समाजघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे,’ अशी अपेक्षा सुरजेवाला यांनी व्यक्त केली. 

जीलानी (पक्षकार) : राम जन्मभूमी-बाबरी मशीद वागद्रस्त जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आम्ही सन्मान करतो, मात्र हा निकाल समाधानकार नसल्याचे मुस्लीम पक्षकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या बाबत नक्की काय करायचे याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतरच आम्ही पुढील पाऊल उचलू असेही या पक्षकारांनी स्पष्ट केले आहे.

ओवेसी : अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीयांनी असमाधान व्यक्त केलं आहे. मशिदीसाठी पाच एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नक्कीच आहे, पण अचूक नाही. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडली नसती तरीही सुप्रीम कोर्टाने हाच निर्णय दिला असता का?, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले, “मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने समाधानी नाही. ज्यांनी बाबरी मशिद पाडली, कोर्टाने त्यांनाच ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिला. बाबरी मशिद पाडली नसती तर कोर्टाने काय निर्णय दिला असता?”. याशिवाय पाच एकर जमीन नाकारावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

शरद पवार : या निकालाचा सर्व वर्गातील लोकांनी आदर बाळगावा आणि देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, ज्यांना जनादेश मिळाला आहे, त्यांनी लवकरच सरकार स्थापन करावे. आम्ही विरोधी बाकावर बसून काम करत राहू या आपल्या भूमिकेचा पवार यांनी पुनरुच्चार केला. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी ही भूमिका पु्न्हा एकदा मांडली. दरम्यान, अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला ही खूपच चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. अयोध्या प्रकरणी हा ऐतिहासिक निर्णय आला असून या निर्णयाचा सर्व वर्गातील लोकांनी सन्मान करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

रामदेव बाबा: कोर्टाचा निर्णय आला, आता अयोध्येत भव्य मंदिर बनेल. पण आपल्याला असं काही करायला नको, ज्याने समाजात भय किंवा आक्रोश निर्माण होईल. भगवान श्रीरामांच्या मर्यादांचं आपणही पालन करूया.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबईसह राज्यात शांततेचं वातावरण कायम राखल्याबद्दल जनतेचे आभार. अयोध्येचा निकाल हा कोणाचा जय-पराजय नाही.

उद्धव ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या जमीन वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं स्वागत करताना निकालाचा आनंद जरूर साजरा करा पण कुठेही काही वेडेवाकडे होईल असे वागू नका, असे आवाहन केले आहे. आपण येत्या दोन-तीन दिवसांत शिवनेरीवर तर २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचेही उद्धव यांनी जाहीर केले. हा आपल्या भारताच्या इतिहासातला एक सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडलेला आहे. यासाठी मी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत घालत आहे. आज एक अध्याय जरी संपला असला तरी एक नवीन पर्व सुरू होत आहे. या पर्वाचे आपण सगळे भारतीय म्हणून स्वागत करूया, असेही आवाहनही उद्धव यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी: देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या खटल्यावर आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे कुणाचा जय किंवा पराजय या दृष्टीनं पाहू नये,’ असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. ‘देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निकालाकडे जय-पराजय या दृष्टीनं पाहायला नको. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, हा क्षण आपल्या सर्वांसाठी भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याचा आहे. शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखण्याचं आवाहन मी देशवासियांना करतो,’ असं मोदी म्हणाले. ‘सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अनेक अर्थानं महत्वपूर्ण आहे. एखादा वाद सोडवण्यात कायदेशीर प्रकियेचं पालन किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं. प्रत्येक पक्षकाराला आपापली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली. न्यायमंदिरानं दशकांपासूनचे प्रकरण सौहार्दपूर्ण पद्धतीनं सोडवलं आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने देशाच्या इतिहासातील मोठा निर्णय दिला. या निर्णयापूर्वी देशभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी काळजी घेण्यात आली होती.