
नवी दिल्ली: शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससह राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चा देखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनीही गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. ‘अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ते एकप्रकारे एनडीएतूनच बाहेर पडले आहेत.
महाराष्ट्रात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा यावरून भाजप-शिवसेना युतीत बिनसलं. शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत.
आता भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यांची व्यवस्था विरोधी पक्षात केली आहे,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.






